छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः जीवघेण्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर पोलिस आयुक्तांनी बंदी घातली आहे. मांजाची विक्री करणार्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेशच पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिले आहेत. सातारा परिसरात मांजा विक्री करणार्या जनरल स्टोअर्स चालकाला ताब्यात घेण्यात आले. इस्माईल शेख उर्फ आदिल हाजी शेख (वय ३७), रा. खंडोबा मंदीराजवळ, सातारा गाव, असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोह सुनिल पाटील यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, ७ डिसेंबर रोजी पोलिस उपनिरीक्षक मेनकुदळे यांच्या पथकात पोह पवार, जाधव, पोअ दिपक शिंदे, पोअ वाडीलाल जाधव यांच्यासह पेट्रोलिंग करीत असताना सातारा गाव परिसरात एक इसम घातक नायलॉन मांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
सातारा गाव मशीद समोर खंडोबा मंदीराच्या पुढच्या गल्लीत इस्माईल जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. येथे इस्माईल शेख हा शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्या ताब्यातून २ हजार १०० किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.
नायलॉन मांजा विक्री प्रकरणी गुन्हा
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी आरोपीवर जीन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख फिरोज हबीब शेख रा.निजामगंज कॉलनी गल्ली नंबर 10 संजय नगर व एक महिला अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जिन्सी ठाण्याचे पोलीस हवालदार शोण मनोहर पवार यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 7 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आरोपी 33 हजार 600 रुपये किंमतीचे 48 नायलॉन मांजाचे गट्टू तसेच प्रत्येकी 500 रुपये किंमतीचे तीन आकाशी रंगाचे नायलॉन मांजाचे अर्धवट गट्टू विक्री करताना आढळून आले. याप्रकरणी जिन्सी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सुरेवाडीत दोन गटात हाणामारी
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः सुरेवाडी गल्ली नंबर 4 मध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. लाठ्या काठ्या व धारदार शस्त्रासह झालेल्या हाणामारी प्रकरणी आरोपीवर हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश राधाकिसन सुरे, किरण प्रेमचंद पचलोरे, रुपेश भागिनाथ सुरे, शिवा अंबादास सुरे, मनीष गंगाधर ब्राह्मणे, ऋषिकेश विजय हाडोळे रा.सर्व सुरेवाडी व दुसऱ्या गटातील कृष्णा एकनाथ ब्रह्मे, दीपक ब्रह्मेे, सागर पांढरे, मनोज हरणे, रमेश खेमचंद गुंजाळ रा. जमनज्योती हर्सूल अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सहायक फौजदार संजय परमेश्वर हंबीर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 6 डिसेंबर रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास दोन्ही गटातील इसम बेकायदेशीरित्या लाठ्या काठ्या व धारदार शस्त्रासह गैरकायद्याची मंडळी जमवून हाणामारी करताना आढळून आले. याप्रकरणी हर्सूल पोलीस पुढील तपास करीत आहेत.















